लातूर : देवणी तालुक्यातील कोनाळी गावातील दलित वस्तीत घुसून जातीय द्वेषातून शिवीगाळ व तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी १२ आरोपींविरुद्ध अ.जा.ज. अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ मार्च २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोनाळी गावातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या जमाव केला. त्यानंतर, जातीय द्वेषातून तुम्ही फार माजलात असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करीत दलित वस्तीत तोडफोड केली. या घटनेत, एका आरोपीने त्याच्या मालकीच्या विना नंबरच्या जेसीबीने पाण्याचा हौद उदध्वस्त केला. तसेच ट्रॅक्टरने ध्वज पाडून टाकण्यात आला.
या कृत्यातून दलित समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर, पुन्हा ध्वज लावल्यास गावात राहू देणार नाही अशी धमकीही आरोपींनी दिली. या गुन्ह्याची फियीद महेंद्र रमेश काळे (रा. कोनाळी (वय २५, ता. देवणी), (इंडियन पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष) यांनी दिल्यावरुन आरोपी अशोक बिरादार, मारुती बिरादार, भरत बिरादार, तानाजी पाटील, गोवर्धन पाटील, वैजनाथ बिरादार (उपसरपंच), पद्माकर पाटील, दिगंबर बिरादार, रामेश्वर पाटील,
बबन बिरादार, अंकुश चामले व अरुण पोलकर या १२ आरोपींविरुद्ध कलम १९१ (१) (२), ३२४ (४), ३५२, ३५१ (२) भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.२२ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास निलंग्याचे पोलीस उपअधीक्षक नितीन कटेकर हे करीत आहेत.









