
नंदुरबारमध्ये चोरीच्या घटना सतत घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या एकाच रात्रीत १३ घरं फोडण्यात आली आहेत.नंदुरबार जिल्ह्यात घरफोड्या आणि दरोडे, चोरांचं सत्र वर्षभरापासून सुरूच आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामध्ये नंदुरबार शहराबाहेरील वसाहतीत चोरट्यांनी टार्गेट केल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून २०० मिटर अंतरावर जि. प कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत १३ घरांची कुलपं तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यातील ११ घरांमध्ये कोणी राहत नसल्याने चोरट्यांची निराशा झाली. मात्र एका घरातून लॅपटॉप, तर दुसऱ्या एका घरातून सोने – चांदीसह सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. तसंच बाहेर उभी असलेली दुचाकीदेखील चोरट्यांनी चोरुन नेली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली.नंदुरबार जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या शेजारीच शासकीय निवासस्थानं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या विविध इमारतींमध्ये कर्मचारी, तर काही अधिकारीदेखील राहतात.
याच वसाहतीला चोरट्यांनी टार्गेट केलं. २३ ते २४ मार्च रोजी रात्री चोरट्यांनी या वसाहतीमधील चार इमारतीमधील तब्बल १३ घरं फोडली. एकाच रात्रीतून तब्बल १३ घरांची कुलूपं तोडण्यात आली. यामध्ये तापी इमारतीतील चार घरं, रंगावली तीन, गोदावरीमधील तीन, तर शिवण इमारतीत तीन घरांचं कुलूप तोडलं असल्याचं चित्र आहे. यातील ११ घरांमध्ये कोणीही राहत नसल्याने नुसतंच कुलूप तोडल्याचं दिसून आलं.मात्र, रंगावली या इमारतीत महिला बालकल्याणमध्ये परिचर म्हणून कार्यरत असलेल्या कविता यशवंत अहिरे राहतात. त्या नंदुरबार शहरातील पटेलवाडीमध्ये राहत असलेल्या त्यांच्या आईकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडत तब्ब्ल सव्वा लाखाहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे. तसंच एक मोबाईल, एटीएम कार्ड चोरट्यांनी चोरुन नेले आहे.
याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कविता अहिरे यांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच एका घरातून लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.याशिवाय एका घराबाहेरी दुचाकी (क्र.एमएच ३९ एई ३०२४) चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनास्थळी पोलीस पथकाने भेट दिली. तसंच श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या २०० मीटर अंतरावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच चोरीचा प्रयत्न झाल्याने येथील रहिवासी धास्तावले आहेत.तीन महिन्यापूर्वी नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीतील राहणाऱ्या पोलिसांच्या चार घरांमध्ये चोरांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी तब्बल चार घरं फोडली होती. यातील तीन घरातून चोरट्यांच्या हाती काहीही लागले नव्हतं. मात्र, एका घरातून ४ लाख २ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यामुळे पोलीसच असुरक्षित आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे.
Video Player
00:00
00:00