पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना नीरा नदीत पोत्यात बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकेवर काढत आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक टोळ्या सक्रीय आहेत त्याचा बिमोड पोलिस करत असताना गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. दरम्यान, भोर तालुक्यातील नीरा नदीच्या पूलाखाली पोत्यात मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे- सातारा महामार्गवर असणाऱ्या सारोळा गावच्या हद्दीत हा मृतदेह सापडला आहे.
नीरा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे इतके असल्याचे समोर आले आहे. हात पाय बांधून पोत्यात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करताना घातपाताची शक्यता वर्तवली आहे. राजगड पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे – सातारा. महामार्गांवर असणाऱ्या सारोळा गावच्या हद्दीत असणाऱ्या नानाची वाडी या हॉटेलच्या कडेस निरा नदीच्या पात्रात एका ३५ ते ४० वयाच्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. या इसमाचा गळा दाबून खून केला असण्याची शक्यता आहे. कारण मृतदेहाच्या गळ्यावर व्रण आहे. संबंधित इसमाच्या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम असे नाव कोरलेले आहे.









