एक मुलगी आपल्या घरातून बेपत्ता झाली असून २८ दिवसांनंतरही पोलिस तिचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहेत. यावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसावर हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे.स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी गेल्या २८ दिवसांपासून बेपत्ता असून, तिचा अद्यापही शोध लागलेला नाही. मुलीच्या अचानक गायब झाल्यामुळे तिचं कुटुंब चिंतेत आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाने फूस लावून तिला पळवून नेले आहे. मात्र, पोलिसांकडून तपास करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










