: नवी मुंबईच्या शाळेची सहल खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्कला आली होती. येथे एका १४ वर्षांच्या मुलाच्या छातीत अचानक दुखू लागलं, त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.रायगडमध्ये पनवेल परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता खालापूर परिसरातून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. नवी मुंबई परिसरात शाळेतील सहली बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.नवी मुंबईमधील घणसोली महानगरपालिका शाळा क्रमांक ७६ मधील शाळेची सहल आज रायगड येथील खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्कमध्ये आली होती. मात्र, या सहलीमध्ये आलेल्या इयत्ता आठव्या वर्गात शिकणाऱ्या कुमार आयुष धर्मेंद्र सिंग या १४ वर्षाच्या मुलाचा हृदय विकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्याचं निधन झाल्याचं समोर आलं आहे.










