पिंपळगाव माळवी तलावात ‘रात्रीस खेळ चाले’

नगर, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या मालकीच्या ७५० एकर क्षेत्र असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातून बेसुमार मुरूम उपसा सुरु आहे. याकडे संबंधित महसूल प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. आता तर तलावाच्या सांडव्यालाच अवैध मुरूम वाहतूक माफियांनी भगदाड पाडले आहे.
पिंपळगाव तलावातून मुरूम उपशाचा रात्रीचाच खेळ चालतो. त्यामुळे काही जाणकार नागरिकांनी तलावाच्या सुरक्षिततेस धोका असल्याचे सांगितले. त्यामुळे अवैध मुरूम वाहतूक करणार्यांना महसूल प्रशासनाने वेळीच लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नगर- वांबोरी रस्त्यावर पिंपळगाव माळवी तलावाचा सुमारे ४०० मीटरचा इंग्रजकालीन तलावाचा दगडी सांडवा आहे. या सांडव्यावर पुलाचे काम सुरु आहे. या कामामुळे रहदारीसाठी पर्यायी रस्ता तलावाच्या सांडव्यातून केला आहे. मात्र काही अवैध मुरूम वाहतूक करणार्या माफियांनी या सांडव्यातूनच मुरूम वाहण्याचा सपाटा लावला आहे.
त्यामुळे भविष्यात तलावाच्या सांडव्याच्या पुलाला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र, महसूल प्रशासनाने याकडे पूर्णता: दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून पिंपळगाव तलावातून मातीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उपसा सुरू आहे. याकडे कोणत्याही जबाबदार अधिकार्यांनी याकडे लक्ष दिले नाही. ही मोठी खेदाची बाब असून तहसीलदार, प्रांताधिकारी, तसेच खाणकर्म अधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष झाले.











