गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?

जळगाव शहराची व्यापारपेठ असलेल्या गोलानी मार्केट आणि नवीन बी. जे. मार्केटचा कायापालट करण्यासाठी महापौर दीपमाला काळे आणि महापालिका प्रशासन सध्या ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मार्केटचे सुशोभीकरण आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असला, तरी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या *’लिफ्ट’*चा प्रश्न मात्र प्रशासनाच्या विस्मृतीत गेल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांचा राबता, मात्र सुविधांचा अभाव
गोलानी आणि बी. जे. मार्केटमध्ये केवळ शहरातीलच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक खरेदी आणि कामानिमित्त येत असतात. या मार्केटमध्ये अनेक महत्त्वाची व्यापारी प्रतिष्ठाने, बँका आणि शासकीय कार्यालये आहेत. मात्र, दोन्ही मार्केटमधील लिफ्ट गेल्या अनेक महिन्यांपासून धुूळ खात पडून आहेत. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.

ज्येष्ठांची पायपीट आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
मार्केटमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णांना वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. गुडघेदुखी आणि इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्धांना या पायऱ्या चढणे अशक्य होत आहे. “प्रशासन मार्केटचा लुक बदलण्याच्या गप्पा मारत आहे, पण आम्हाला चालण्यासाठी किमान लिफ्टची सोय करू शकत नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महापौरांच्या ‘ॲक्शन मोड’कडे जनतेचे लक्ष
महापौर दीपमाला काळे यांनी सध्या शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. मार्केटच्या सुशोभीकरणासोबतच या तांत्रिक पण महत्त्वाच्या सुविधेची दुरुस्ती त्यांच्या कार्यकाळात होईल का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. केवळ दिखाव्यासाठी रंगरंगोटी न करता, लिफ्टसारखी अत्यावश्यक सेवा तातडीने कार्यान्वित व्हावी, अशी मागणी जळगावकरांकडून होत आहे.
आता महापौरांच्या या ‘ॲक्शन मोड’मध्ये बंद लिफ्टला संजीवनी मिळणार की नागरिकांची पायपीट कायम राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









