सेवानिवृत्त एसटी कर्मचारी रस्त्यावर

जळगांव ( वार्ताहर ) सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले होते. जिल्हाभरातील जवळपास पंधराशे ते दोन हजार सेवानिवृत्त कर्मचारी जळगांव बस स्थानकावर एकत्र झालेत. सर्वप्रथम संघटनेमार्फत जळगांव विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांना निवेदन देण्यात आले. त्याच्यानंतर शिस्त आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. याप्रसंगी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, सदर सभेला सुरेश चांगरे, योगराज पाटील, सुभाष जाधव यांनी संबोधित केले.. सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यात दुर्लक्षित केल्यास आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचे केले जाईल असे प्रतिपादन वक्त्यांनी केले. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, म्हणत कर्मचारी मार्गक्रमन करत होते.
याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आंदोलन करणाऱ्या सेवानिवृत्त एसटी कर्मचारी प्रतिनिधीशी चर्चा करून शासन दरबारी प्रश्न पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत खालील प्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले
1) एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव कामाचे तास कमी करण्यात यावे..
2) फॅमिली पास सुविधे अंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसला निशुल्क प्रवास मिळावा..
3) वाढीव पेन्शन मिळावी.
4) मागील सर्व प्रकारची थकीत रक्कम मिळावी.
5) एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी एका विशेष समितीचे गठन करण्यात यावे. या समितीच्या अभ्यास अहवालास लागू करणे एसटी महामंडळात बंधनकारक करण्यासंदर्भात कायदा बनवण्यात यावा. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देतेवेळी संघटनेचे सचिव सुरेश चांगरे, योगराज पाटील, सुनील पाटील, सुनील बडगुजर, रमेश सपकाळे, गुलाब शेख, अरुण साळुंखे, अमृत पाटील, विलास कदम, अशोक कुमार गाढे, दिलीप सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, बीसी महाजन, भगवान ब्रहमे आदी उपस्थित होते…








