अवैध गौण खनिजाला प्रशासनाचाच आशीर्वाद? कारवाई करण्यास जामनेर महसूल विभागाची टाळाटाळ! जामनेर तालुक्यात सर्रास अवैध गौण खनिज उत्खनन – प्रशासन मूकदर्शक? सर्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रशासन मात्र गप्प.. अवैध गौण खनिज उत्खननावर प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ..

जामनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील गाडेगाव ते हिंगणे रस्त्यावरील टेकडी परिसरात आज सकाळी पोकलँड मशीनच्या सहाय्याने हजारो ब्रास गौण खनिजाचे सर्रास अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी तातडीने 112 वर पोलिसांना आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिली. मात्र, जिल्हाधिकारी यांनी जबाबदारी प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांकडे ढकलून मोकळा श्वास घेतल्याची चर्चा सुरू आहे. सदर घटनेबद्दल तहसीलदार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी परवानगी घेतली आहे की नाही याबद्दल माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर मंडळ पाठवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र माहिती मिळवूनही पाच तास उलटल्यानंतर महसूल विभागाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही .या गंभीर प्रकरणाची माहिती मिळूनही प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी किंवा महसूल पथक यांनी घटनास्थळी जाण्याची तसदी घेतली नाही. इतकेच नव्हे तर, तक्रारदारांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन घेणेसुद्धा थांबवले गेले.
अवैध उत्खननाचे डोंगर डोळ्यांसमोर असूनही महसूल प्रशासनाने हालचाल न करण्यामागे अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जोडले गेले आहेत का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. अवैध धंद्यांना प्रशासनाचा वरदहस्त? जळगाव जिल्ह्यात सर्रास अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज उत्खनन सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जामनेर तहसीलदार आणि महसूल विभाग पूर्णपणे अपयशी ठरले, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनतेत चर्चा अशी की “अवैध धंदे प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरूच राहू शकत नाहीत.” प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे जामनेर तालुक्यातील टेकड्या दिवसेंदिवस उघड्या पडत आहेत, तर शासनाचा महसूल कोट्यवधींच्या घरात लुटला जात आहे. तर दुसरीकडे मात्र प्रशासनातील अधिकारीच या सर्व प्रकरणांवर मौन बाळगून गप्प बसलेले आहेत.
मुरुमाला मोठ्या प्रमाणात मागणी असून, शासनाचा महसूल बुडवत अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे. या उत्खनन व वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे?, असा सावाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. यामुळे मुरुमाला सोन्याचा भाव आला, तर कर्मचारी, अधिकारी मालामाल झाल्याचे बोलले जात आहे. अवैध गौण खनिज उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न सर्वच नागरिकांना पडला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. यात दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्याची मागणी जामनेर परिसरातील नागरिकांमधून होत आहे.











