भडगाव नगरपरिषदेत रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

भडगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या लोककल्याण मेळावा उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून भडगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नगरपरिषदेच्या पुढाकाराने लोककल्याण मेळाव्याअंतर्गत नागरिक व पथ विक्रेत्यांसाठी विविध उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षण सत्रात भारतीय अन्न पदार्थ व मानांक प्राधिकरण (FSSAI) चे तज्ज्ञ श्री. रामेश्वर राजू यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना व्यवसाय करताना पाळावयाचे नियम, शासनाकडून मिळणारी प्रमाणपत्रे, तसेच अन्नपदार्थ विक्रीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी ठाकूर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय संघटक श्री. राजेंद्र गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय अधिक शिस्तबद्ध व स्वच्छतेच्या दृष्टीने उभारण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.








