सातपुडा जंगल सफारी , निसर्गाशी संवाद साधणारी सफर,ॲड जमील देशपांडे….

रविवारची ती सकाळ अजूनही मनात ताजी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवावे, या इच्छेने आम्ही परिवारासह निघालो होतो पाल (ता. रावेर) येथील सातपुडा जंगल सफारीकडे. प्रवास सुरू झाला आणि समोर उभा ठाकला नागमोडी पाल घाट. एका मागोमाग एक वळणं घेत वर चढताना हृदयाचे ठोके क्षणभर वाढले, अंगावर काटा आला. पण जसजसं वर पोहोचलो तसतसा सातपुड्याच्या कुशीत पसरलेला हिरवा गार शालू डोळ्यांसमोर उलगडला.

यावल वनविभागाने उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख (भा.व.से.) यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली उभारलेली ही जंगल सफारी म्हणजे जळगाव जिल्ह्यातील निसर्गप्रेमींसाठी एक अनमोल भेट आहे. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात, भव्य जंगलाच्या कुशीत, दडलेली अनेक रहस्यं पर्यटकांसमोर उलगडत जातात. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत सुरू असणाऱ्या या सफरीसाठी तीन उघड्या जीप्स सज्ज असतात. आम्ही दुपारी दोनच्या सुमारास आत प्रवेश केला. उघड्या जीपमधून सुरू झालेला २७ किलोमीटरचा प्रवास म्हणजे जणू निसर्गाशी बोलण्याचीच एक संधी होती. सोबत असलेला गाईड फक्त मार्गदर्शन करत नव्हता, तर जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक वळण, प्रत्येक पाणवठ्याशी ओळख करून देत होता.
सफरीदरम्यान हरिण, मोर आमच्या नजरेस पडले. वाघ मात्र दिसला नाही. गाईड हसत म्हणाला, “सकाळच्या गारठ्यात वाघ सहज दिसतो. दुपारच्या उन्हात तो जंगलाच्या सावलीत निवांत विसावतो.” त्या क्षणी वाघाचं दर्शन न घडलं, पण त्याच्या अस्तित्वाची चाहूल मात्र प्रत्येक झुडपामागे, प्रत्येक पायवाटेत जाणवत होती. या जंगलाची खासियत म्हणजे येथे असलेले सर्व प्राणी हे मुक्त विहार करणारे आहेत. कुठूनही आणलेले नाहीत, तर निसर्गाने दिलेल्या अधिवासात ते स्वतंत्रपणे जगतात. त्यामुळे येथे भेट देणाऱ्यांना कृत्रिमतेचा अंशही जाणवत नाही; जाणवतं ते फक्त निसर्गाचं खरं रूप.

अस्वल, तरस, लांडोर, भेकर, चिंकारा, खोकड यांचे पाणवठे, वाघडोह, सातपुडा व्हॅली, किंगफिशर हट ही आकर्षणं डोळ्यांना सुखावतात, मनाला भारावून टाकतात. मध्येच दिसणारे धबधबे, नैसर्गिक तलाव या प्रवासात नवा उत्साह भरतात. जंगल सफारीनंतर आम्ही वन विभागाच्या रेस्ट हाऊसला थांबलो. सुबक बांधकाम, निसर्गाच्या सान्निध्यात मुक्कामाची सोय आणि चविष्ट जेवण या सगळ्यामुळे हा मुक्काम अधिकच संस्मरणीय ठरला. थकवा जणू क्षणात दूर झाला. जवळचं सुकी धरण पाहताना मात्र निसर्गाने दिलेली शांतता हृदयात मुरली. जलाशयावर उमटणाऱ्या डोंगरांच्या सावल्या, भोवतीची हिरवळ – सगळं काही कवितेसारखं वाटलं.
आज वाघ पाहण्यासाठी ताडोबा किंवा इतर जंगलांमध्ये जाणं म्हणजे वेळखाऊ आणि खर्चिक ठरतं. पण सातपुड्याच्या कुशीत आपल्या जळगाव जिल्ह्यातच एवढं सुंदर ठिकाण आहे, हे जाणवलं की आत्मिक समाधान लाभतं. या सफरीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जीप ड्रायव्हर, गाईड, पर्यटकांसाठी ट्रीप आयोजित करणारे आयोजक या सगळ्यामुळे वन पर्यटन एक उदयोन्मुख व्यवसाय ठरत आहे.
संपूर्ण प्रवास संपला, पण मन मात्र अजूनही त्या हिरव्या दऱ्यांत भटकत आहे. आणि मनात एकच भावना दाटून आली “सातपुड्याच्या कुशीतलं हे जंगल ही केवळ सफर नाही, तर निसर्गाने दिलेली एक आध्यात्मिक अनुभूती आहे.” उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन त्यांनी जळगावकरांना निसर्गाशी पुन्हा एकदा जवळीक साधण्याची अमूल्य संधी दिली आहे. ॲड जमील देशपांडे जळगांव








