विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिकतेची ज्योत – गणपती अथर्वशीर्ष व स्तोत्र पठण उपक्रम.

थोरगव्हाण येथिल डी. एस. देशमुख विद्यालयात गणपती उत्सवानिमित्त अलीकडेच एक आगळावेगळा अध्यात्मिक उपक्रम पार पडला. सौ. योगिता संजय झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. जयश्री प्रविण चौधरी यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांकडून गणपती अथर्वशीर्ष व गणपती स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे मन एकाग्र ठेवणे, त्यांच्यात सकारात्मकता वाढवणे व संस्कारमूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. याच हेतूने श्री गणेशोत्सव स्थापना निमित्त विद्यालयातील सांस्कृतिक समिती तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोपासनेतून मिळणारी बुद्धी, विद्या व सुख-समृद्धीची ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये संचारली, हे स्पष्ट जाणवले.
योगिता संजय झोपे यांनी गणपती अथर्वशीर्ष पठणाचे महत्त्व समजावून सांगताना स्पष्ट केले की – “अध्यात्मिकता ही केवळ पूजा-अर्चनेत नसून, ती विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीत आणि व्यक्तिमत्त्व विकासात आहे. अथर्वशीर्षातील प्रत्येक मंत्र मनःशांती, आत्मविश्वास व एकाग्रता देणारा आहे.” संपूर्ण सभागृहात एकसुरात उमटणाऱ्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले. विद्यार्थी मंत्रपठण करताना त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची झलक आणि शिक्षकांच्या डोळ्यांतील समाधान हेच या उपक्रमाचे यश ठरले.
सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. जयश्री प्रविण चौधरी यांनी गणपती स्तोत्राचे सामूहिक पठण विद्यार्थ्यांकडून करून घेतले व मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना सांगितले की – “विद्यालयीन शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता ते आध्यात्मिक, सांस्कृतिक व मूल्याधारित असावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मिक बळ मिळते व भारतीय परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो.”

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की – “विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संस्कार. गणपती अथर्वशीर्ष व स्तोत्र पठण हे जीवनात सत्य, सदाचार व शिस्त अंगीकारण्याची शिकवण आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आत्मिक बळ मिळते, मनःशांती लाभते व भारतीय परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो. सौ. योगिता संजय झोपे मॅडम यांचे हे कार्य कौतुकास्पद असून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे.”
या कार्यक्रमासाठी क्रीडाशिक्षक जे. ए. चौधरी यांनी बैठक व्यवस्थापन केले. टी. पी. घुले यांच्यासह सर्व सांस्कृतिक समिती सदस्य, शिक्षकवृंद, बंधु-भगिनी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.








