हिंद लष्कर ऑन ॲक्टिव मोड जळगावचे “हिंदकेसरी” सेवेसाठी सज्ज.

जळगाव : राष्ट्रसेवेचा संकल्प घेऊन उभी राहिलेली *हिंद लष्कर* ही सामाजिक चळवळ आता सक्रिय मोडमध्ये आली आहे. देशभक्तीची नाळ जपणाऱ्या आणि सामाजिक सेवेला सर्वोच्च स्थान देणाऱ्या या वैचारिक गटाने आता आपल्या कार्याचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे.
या विषयात जळगाव शहरात नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक आय.पी.एस. श्री. महेश्वर रेड्डी यांची भेट घेण्यात आली. सार्वजनिक महोत्सव, गावी व शहरी भागातील एकत्रीकरण कार्यक्रम, गणेशोत्सव, नवरात्र, मिरवणुका यामध्ये सुसुत्रता, शिस्तबद्धता, शांतता व नियोजनबद्ध सहभाग यासाठी हिंद लष्करचे शिलेदार सक्रिय राहतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या भेटीत हिंद लष्करचे हिंदकेसरी प्रतीक साळी, गौरव राजपूत, गणेश पाटील, योगेश महाजन आणि इतर शिलेदार उपस्थित होते.
हिंद लष्कर ही केवळ एक चळवळ नसून, ती एक मूल्याधारित विचारसरणी आहे , जी देशभक्ती, सामाजिक समरसता, व नैतिक नेतृत्व यावर आधारित आहे. या उपक्रमाविषयी बोलताना *सरलष्कर चिन्मय महाजन* म्हणाले : “राष्ट्रसेवेसाठी हिंद लष्कराचे असंख्य शिलेदार भारतभर कार्य करतील. त्याची सुरुवात जळगाव येथून होत असून लवकरच आम्ही जनतेच्या सेवेत सक्रियपणे सहभागी होऊ. हे लष्कर शौर्य, धैर्य आणि औदार्य या तीन स्तंभांवर उभे आहे.”

या पुढील काळात हिंद लष्कर विविध सामाजिक उपक्रम, आपत्कालीन सेवा, देशाभिमान जागविणाऱ्या कार्यशाळा आणि शांततेसाठी सहकार्य उपक्रम हाती घेणार आहे.








