मुंबईतील अॅक्वा लाईन भुयारी मेट्रो स्टेशनला शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत मुंबई मेट्रोच्या कामाची पोलखोल केली.राजधानी मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस (Rain) पाहायला मिळाला. या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं असून मुंबईची तुंबई झाल्याचं मुंबईकर म्हणत आहेत. या पावसामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला असून भुयारी मेट्रो स्थानकात पावसाच्या पाण्याचे तळेच साचल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वा लाईन सुरु केली होती. आरे ते वरळी असा मार्ग असणारी ॲक्वा लाईन (Metro Aqua line) भुयारी मार्गाने धावते. भुयारी मेट्रो मुंबईसारख्या शहरात कितपत व्यवहार्य ठरणार, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, राज्य सरकारने भुयारी मेट्रो पूर्णपणे सुरक्षित आहे, पावसात याठिकाणी काहीच होणार नाही, असा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात अवघ्या काही तासांत भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयाण अवस्था पाहायला मिळाली.










