रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील गोपाळगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम अखेर प्रशासनाने जमीनदोस्त केले. पुरातत्व विभागाने केलेल्या या कारवाईत दुकान, घर, पाण्याची टाकी आणि इतर बांधकामे जेसीबीने पाडण्यात आली.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. २ एप्रिल २०२५ नंतर बांधकाम पडणार हे निश्चित होते. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. अखेर शनिवारी (ता. २४) पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यामध्ये तेथील जागा मालकाने २०२४ मध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची अंतिम सूचना सहाय्यक संचालक, पुरातत्व विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी १७ मार्च २०२५ रोजी सुफिया युनूस मणियार आणि कादिर हुसेन मण्यार यांना देण्यात आली होती. सदर नोटीसीवर म्हणणे मांडण्यासाठी २ एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतू कोणतेच म्हणणे सादर झालेले नाही. त्यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.अखेर शनिवारी (ता. २४) पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपाळगड किल्ल्यातील दुकान, घर, पाणी साठवण्याची टाकी, २ स्वच्छतागृहे, आणि आंबे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला चिरेबंदी मांडव जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.










