पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तरार यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. पहलगाम हल्ल्याच्या आधारावर भारत सरकार कारवाई करू शकते, असा इशारा त्यांनी दिला. ‘पाकिस्तान स्वत: दहशतवादाने पीडित आहे. देशाने नेहमीच दहशतवादाच्या सगळ्या स्वरूपांचा निषेध केला आहे. पाकिस्तानने आयोगाद्वारे विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीचा प्रस्ताव ठेवला आहे, पण भारत तपास टाळत आहे आणि संघर्षाचा मार्ग निवडत आहे,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तरार यांनी केली. भारत आगामी २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याची योजना आखत असल्याची माहिती विश्वसनीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
‘पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबाबतच्या निराधार आरोपांच्या आधारे भारत सरकार हल्ल्ल्याची तयारी करत आहे,’ असे तरार यांनी म्हटले आहे. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाला सतर्क राहायला हवे. भारतीय सैन्याने केलेल्या कोणत्याही कारवाईला निश्चित आणि निर्णायक उत्तर दिले जाईल. संघर्षाची स्थिती वाढण्याची आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे भारताची असेल,’ असा पोकळ इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्य दलांना पूर्ण मोकळीक दिली आहे. ‘दहशतवादी आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांना शोधून भारत त्यांना शिक्षा करेल,’ असा इशारा मोदी यांनी दिला. यानंतर पाकिस्तानकडून हल्ल्याची पुन्हा भीती व्यक्त करण्यात आली आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारत सोडण्याचे आदेश सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिल्यावर सहा दिवसांत वरून ७८६ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले.









