शेकापमधील काही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाच शेकापचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांनी मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीसहित शेकाप पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जे. एम. म्हात्रे यांनी शेकाप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (२९ एप्रिल) पनवेलमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.काही दिवसांपूर्वी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील यांच्या सहित असंख्य कार्यकर्ते यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, यांच्या उपस्थित मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रवेश केला होता.त्या घटनेला महिना उलटत नाही तोच दुसरा धक्का पनवेल मधून देण्याची तयारी सुरू झाली आहे.










