मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील क्रोमा शोरुमला भीषण आग लागली. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे शोरुममधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील क्रोमा शोरुमला आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता ही आग लागल्याची माहिती आहे. सकाळपासूनच या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग इतकी मोठ्या प्रमाणात पसरली होती, की शोरुममधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलच्या तिसऱ्या मजवल्यावर क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम आहे. या क्रोमा शोरुमला पहाटे ४ वाजता आग लागली. लेव्हल ४ ची ही आग असल्याची माहिती मिळते आहे. पहाटेच्या वेळी आग लागल्याने या मॉलमध्ये कोणीही नव्हतं. त्यामुळे जिवितहानीचा मोठा धोका टळला. मात्र क्रोमा शोरुममधील इलेक्ट्रिक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगीत वस्तू जळून खाक झाल्या आहेत.










