
नागपुरात पान टपरीवर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि हत्येची घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यभरात हत्येच्या, चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. उपराजधानी असलेल्या नागपुरातही हत्येच्या घटना सतत समोर येत आहेत. आतापर्यंत अनेकांना या गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. उपराजधानीत हत्येचे सत्र सुरूच असून, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर परिसरात कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.जितेंद्र ऊर्फ जितू राजू जयदेव वय ४० रा. भीम चौक, असं मृतकाचं नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी इतवारीदास शिवदास माणिकपुरी वय ३५ रा. नवीननगर याला अटक केली आहे.
जितूविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. इतवारीदासविरोधात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.इतवारीदासचा मोबाइल चोरी गेला. जितू याने मोबाइल चोरी केल्याचा संशय त्याला आला. सोमवारी सायंकाळी इतवारीदास हा हिवरीनगरमधील पान ठेल्यावर गेला. येथे जितू उभा होता. इतवारीदास याने जितूकडे मोबाइलबाबत विचारणा केली. माझ्याकडे मोबाइल नाही, असं जितू त्याला म्हणाला. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला.
वादादरम्यान जितूने इतवारीदासच्या कानशिलात लगावली. इतवारीदास संतापला. त्याने काठीने जितूच्या डोक्यावर वार केले. तिथेच घटनास्थळीच जितूचा मृत्यू झाला. जितूवर हल्ला करुन, त्याला ठार केल्यानंतर इतवारीदास घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जितूचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेऊन इतवारीदास याला पोलिसांनी अटक केली आहे.
Video Player
00:00
00:00