
धार्मिक-सामाजिक एकतेचा उत्सव बोरगावात साजरा पालकमंत्र्यांच्या हस्ते बोरगाव बु. येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री मारोती रायांची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने संपन्न !तीन दिवसांच्या भागवत सप्ताहाने गावात भक्तिरसाची उधळण : बोरगाव बु. येथील मध्यवर्ती श्री मारोती मंदिर परिसरात २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री मारोती रायांची प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व विधिवत पूजाविधीने संपन्न झाली. या शुभप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की, “ही प्राणप्रतिष्ठा केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि गावकऱ्यांच्या एकतेचा उत्सव आहे.
भागवत सप्ताह, सामाजिक सभागृह उभारणी आणि मंदिर कार्यात गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. गावाचा विकास पायाभूत सुविधा पुरवण्या बरोबर अशा धार्मिक-सामाजिक उपक्रमातून संस्कृती निर्माण होते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.या उपक्रमासाठी मूलभूत सुविधा योजनेंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानिमित्त तीन दिवसीय भव्य कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या पहील्या दिवशी ह.भ.प. संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर), दुसऱ्या दिवशी ह.भ.प.सौ कांचनताई जगताप (त्र्यंबकेश्वर) आणि समारोप ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्या अध्यात्मिक कीर्तनरसातुन भक्ती भाव वातावरणात पार पडले. महाप्रसादाचा लाभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने उपस्थितांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक भैया मराठे सर यांनी तर आभारप्रदर्शन मा. उपसरपंच नितीन पाटील यांनी केले. याप्रसंगी सरपंच सौ. उषाबाई मराठे, उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश मराठे, दीपक पाटील, किशोर शेडगे, बापू पवार, गोकुळ पाटील, किशोर मराठे, पिंटू पाटील, किशोर तोंडे, शाखा प्रमुख सुदाम मराठे यांची उपस्थिती होती. बोरगाव बु. व बोरगाव खु. येथील भजनी मंडळाच्या सुरेल भजनांनी सोहळ्याला भक्तिरसात रंग भरले. गावकरी, महिला, युवक आणि वयोवृद्ध यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाची शोभा वाढवली.