लग्नानंतर १० वर्षांनी अमित आणि निशा यांना पुत्रप्राप्ती झाल्याने दोघेही अंश याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. टिळक चौक परिसरातील खासगी नर्सरीत अंश प्लेग्रुपमध्ये शिकत होता. शाळेतून मुलाला घेऊन घरी जात असताना, रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्याने आईसह तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पश्चिमेत बुधवारी घडली. निशा सोमेसकर (३५) आणि अंश सोमेसकर (३) अशी या दोघांची नावे आहेत.
बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणकडून येणाऱ्या ट्रकने या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.अमित सोमेसकर दीड वर्षापूर्वी पत्नी आणि मुलासह कल्याण पश्चिमेकडील ठाणकरपाडा परिसरात श्री समर्थ अष्टविनायक कॉलनीत राहण्यास आले होते. लग्नानंतर १० वर्षांनी अमित आणि निशा यांना पुत्रप्राप्ती झाल्याने दोघेही अंश याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. टिळक चौक परिसरातील खासगी नर्सरीत अंश प्लेग्रुपमध्ये शिकत होता. दोन दिवसांपूर्वीच सोमेसकर दाम्पत्याने कल्याणमधील नामांकित शाळेत अंशला प्रवेश घेतला होता. पुढच्या महिन्यात आपण भाड्याने घेतलेली खोली सोडणार असल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले होते.खासगी कंपनीत काम करणारे अमित मंगळवारी रात्री कार्यालयीन कामानिमित्त बेंगळुरूला जाण्यासाठी निघाले होते. पहाटेच्या विमानाने ते बेंगळुरूला पोहोचण्यापूर्वीच कल्याणमध्ये त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. पत्नी आणि मुलाच्या अपघाताची माहिती मिळताच, अमित यांनी तातडीने परतीचा प्रवास सुरू केला. हे दोघेही सुरक्षित असतील, असे स्वत:ला समजावत अमित कसेबसे कल्याणला पोहोचले. त्यांना समोर पाहताच नातेवाईकांनी टाहो फोडला आणि अमित यांच्या पायाखालची जमीन सरकली.