सकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉ. अग्रवाल यांचा लहान मुलगा अर्पण संजय अग्रवाल (१७) हा गॅलेरीचे बांधकाम बघण्यास गेला होता. यावेळी अर्पणचा अचानक तोल गेल्याने तो गॅलरीतून जमनीवर कोसळला.शहरातील सुप्रसिद्ध अर्चना हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय अग्रवाल यांचा लहान चिरंजीव अर्पण संजय अग्रवाल याचा आज सकाळी अकस्मात मृत्यू झाला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून तोल जावून खाली कोसळल्याने अर्पण अग्रवाल याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, शहरातील मालेगाव रोडवरील जे. बी. नगरात डॉ. संजय अग्रवाल यांचे अर्चना हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या वरील मजल्यावर डॉ. अग्रवल हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. हॉस्पीटलच्या दुसऱ्या मजल्यावर गॅलेरीचे बांधकाम सुरु आहे. काल (दि.२०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉ. अग्रवाल यांचा लहान मुलगा अर्पण संजय अग्रवाल (१७) हा गॅलेरीचे बांधकाम बघण्यास गेला होता. यावेळी अर्पणचा अचानक तोल गेल्याने तो गॅलरीतून जमनीवर कोसळला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द झाला. त्यास तातडीने नातेवाईकांनी खाजगी वाहनाने हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठीकाणी डॉ. भैरव वाईजे यांनी तपासणी करुन अर्पण अग्रवाल यास मृत घोषीत केले. याप्रकरणी स्मित सुनिल अग्रवाल यांनी दिलेल्या माहीतीवरुन धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार संजय काशीनाथ सुर्यवंशी हे करीत आहेत.