मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 8.30 वाजता एक भीषण अपघात झाला. बेस्टच्या बसने रस्त्यावरील अनेक लोकांना चिरडले. 7 जणांचा मृत्यू. कुर्ला परिसरातील लालबहादूर शास्त्री रोडवर (एलबीएस रोड) झालेल्या अपघाताच्या मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या अपघातासाठी कारणीभूत असलेला बसचालक संजय मोरे हा कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. बेस्टमधील या कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही काहीही करणे शक्य नसल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी केला. बेस्ट प्रशासन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहे. ज्या कंपनीला बेस्टकडून (BEST Bus) कंत्राट देण्यात आले आहे, त्यांचे स्वत:चे ऑफिसही मुंबईत नाही. ते एका कंटेनरमध्ये बसतात. कालच्या अपघातामधील जो चालक नियुक्त करण्यात आला होता, त्याच्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. बेस्टच्या अधिकाऱ्यांना या कंपनीला जाब विचारायचा असेल तर हैदराबादला फोन करावा लागतो. तिकडेही कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. मग बेस्टमध्ये या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना का घेतले जाते हैदराबादच्या या कंपनीवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, ज्याच्यामुळे बेस्टमध्ये ही कंपनी चालते, असा सवाल सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.










