सोलापुरातील ख्यातनाम मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे.ख्यातनाम मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या अकाली निधनाने सोलापुरातील वैद्यक क्षेत्राचेच नव्हे, तर एकूणच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासारखा तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर हा समाजाचा एक ठेवा असतो. कमालीची गुंतागुंत असलेल्या मेंदूला समजून घेऊन त्याच्याशी संबंधित आजार बरे करणे ही सोपी गोष्ट नाही. मेंदूविज्ञान अजूनही विकसित होत आहे, हेही त्याच्या मागील एक कारण. मात्र, डॉ. वळसंगकर यांनी या विज्ञानात केवळ गतीच प्राप्त केली होती असे नाही, तर तिचा उपयोग करून ते रुग्णांना पुन्हा उभे करीत होते.
तीन दशकांहून अधिक काळ रुग्णसेवा करून डॉ. शिरीष वळसंगकर यांनी वैद्यक क्षेत्रात आपल्या नावाची मुद्रा उमटविली होतीच; परंतु त्याचबरोबर सोलापूरसारख्या मिश्रभाषक शहरातील सामाजिक जीवनातही स्थान कमावले होते. वैद्यकीय क्षेत्राला कमालीचे व्यावसायिक स्वरूप येत असताना, मानवतेला प्राधान्य देऊन रुग्णसेवा करणारे डॉक्टर संख्येने कमी असले, तरी अजूनही आहेत. डॉ. वळसंगकर हे त्यांपैकी एक होते.सोलापुरातच शालेय आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी कुर्डुवाडी, कोल्हापूर, मुंबई यांसह विविध ठिकाणी रुग्णसेवा केली आणि त्यानंतर परत सोलापुरातच त्यांनी सेवा सुरू केली. मेंदूच्या आजाराशी संबंधित सुविधांसाठी मुंबई, पुणे या शहरांवर अवलंबून असतानाच्या काळात त्यांनी सोलापुरात सुविधा निर्माण केल्या.









