
पथकाने पाच अधिकाऱ्यांसह अन्य नऊ संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून, सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. त्या संदर्भातील ‘व्हॉटसॲप चॅट’ सीबीआयच्या हाती लागले आहे.नाशिक येथील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन आणि ओझर येथील लष्करी जवानांच्या वेतनासह विविध भत्त्यांसंदर्भातील देयके देण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयासह संलग्न कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय एसीबी) मुंबई पथकाने केलेल्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. पथकाने पाच अधिकाऱ्यांसह अन्य नऊ संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून, सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. त्या संदर्भातील ‘व्हॉटसॲप चॅट’ सीबीआयच्या हाती लागले आहे.
सीबीआय एसीबीच्या मुंबई पथकाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या आर्टिलरी व आर्मी एव्हिएशन सेंटरच्या (एएसी) वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखापरीक्षक संशयित नवीन कुमार मिणा, अजय कुमार, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अनुप कुमार उर्फ अनुप पटेल, अश्विनी कुमार पांडेय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. यासह नाशिकच्या ओझर येथील ‘एओजीई’ कार्यालयातील लेखापरीक्षक संशयित विकास कुमार मीना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. आर्टिलरी व आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील (ओआरएस) लेखापरीक्षक संशयित मोहित स्वामी याच्याविरुद्धही गुन्हा नोंद आहे. या तीन गुन्ह्यांतील पाच संशयितांसह अन्य नऊ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.