पैशासाठी विवाहितेचा सासरी छळ करून मारहाण करून खून केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे, दीर व नणंद अशा पाचजणांना प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अफरीन शेख असे मयत महिलेचे नाव असून जानेवारी 2020 मध्ये तिचा मारहाणीत मृत्यू झाला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुजक्कीर शेख (वय 33), फरजाना उर्फ सायराबानु रियाजुद्दीन शेख (वय 54), रियाजुद्दीन शेख, असीम शेख (वय 31), अलमास शेख (वय 27, सर्व रा. आखेगाव रोड, शेवगाव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. मयत अफरीन हिला सासरच्या मंडळींनी मोबाईल दुकानासाठी 50 हजार रुपये आणण्यासाठी, उसने पैसे परत देण्यासाठी 80 हजार रुपये आणण्यासाठी त्रास दिला.
मारहाण करून माहेरी आणून सोडले. घरात उपाशी ठेवून कोंडून ठेवले होते. 19 जानेवारी 2020 रोजी मयत महिलेच्या वडिलांना त्यांच्या मुलीला शेवगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्याचा फोन आल्याने ते तेथे गेले असता त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिच्या अंगावर जखमा दिसत होत्या. शेवगाव पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मयत महिलेचे वडील गियासुदीन शेख यांनी 20 फेब्रुवारी 2020 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
मयत अफरीन हिचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानुसार मृत्यूपुर्वी तिच्या अंगावर 24 जखमा आढळल्या होत्या. मयतास मारण्यासाठी वापरलेली बांबूची काठी हस्तगत करण्यात आली होती. आरोपींनी पैशांच्या मागणीसाठी अफरीन हिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिचा खून केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्यावतीने 5 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने तोंडी व कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन बाळासाहेब पवार यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक एम.ए.जोशी व हेड कॉन्स्टेबल अशोक एन. बेळगे यांनी सहाय्य केले.