सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान, बंभाडा येथील शिक्षिका स्वाती चौधरी यांचाही समावेश; शहापूर येथे सोहळा संपन्न.

रावेर (प्रतिनिधी, कमलेश पाटील): राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या ‘सावित्री शक्ती पीठ, पुणे’ या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुरहानपूर जिल्ह्यातील शहापूर येथील माळी समाज पंच मंडळाच्या संत सभागृहात मंगळवार, ८ मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ कर्तबगार महिलांना ‘सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत, महिलांना आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प करण्यात आला. समाजात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, या उद्देशाने हा गौरव करण्यात आला.

श्रीमती स्वाती चौधरी यांचा गौरव
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बंभाडा गावातील शिक्षिका श्रीमती स्वाती प्रवीण चौधरी यांना यावेळी “सावित्री शक्ती पीठ, पुणे” या संस्थेमार्फत सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे बंभाडा परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास शहापूर माळी समाज पंच मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. सावित्री शक्ती पीठाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिला शक्तीला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.







