पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे पिंपरीनांदू येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ठीक ९:३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला निळा गंध लावून, अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामपंचायतीसमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावर्षीच्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे बुद्ध वंदना घेतल्यानंतर ‘भीमरायाचा पाळणा’ म्हणण्यात आला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी जयंतीनिमित्त गावातून महामानवांची भव्य मिरवणूक काढण्याचा आगळावेगळा निर्णय याप्रसंगी जाहीर करण्यात आला.
या कार्यक्रमाला सरपंच प्रतिभा पाटील, ग्रा.प. सदस्य किशोर पेटारे, दिनकर निकम, सुधाकर तायडे, विशाल चौधरी, भागवत चौधरी, प्रतिभा निकम, उषा निकम, मंदा निकम, मंदा गायकवाड, रूपाली कोळी, तसेच किशोर चौधरी, नितीन चौधरी, मिलिंद तायडे, पंडित तायडे, सचिन भालेराव, तुषार भालेराव, काळू मास्टर आणि केंद्र चालक मधुकर भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी कैलास भगत, शिपाई समाधान कोळी आणि पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील भीमअनुयायी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.







