जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नियमित अपघाताची घटना घडत असतांना दि.१३ रोजी देखील जामनेर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळ महिंद्रा पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाल्याची घटना १३ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून पावरा समाजाचे जवळपास ४० मजूर ऊस तोडण्यासाठी महिंद्रा पिकअप गाडीने महाराष्ट्रात येत होते.
दरम्यान, जामनेर ते पहुर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळील वळणावर ही गाडी उलटली. या अपघातात पावरा समाजाचे एकूण १४ जण जखमी झाले आहेत. यातील धर्मा बारेला (वय ३०), जितेंद्र बारेला (वय १६, सुभा राजू बारेला (वय १३), तुळशीराम बारेला (वय ३५), अनिल तोवरसिंग बारेला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. तर ९ जणांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पहुर येथील १०८ रुग्णवाहिकेचे चालक अमजद खान व डॉक्टर लियाकत अब्बासी यांनी धाव घेतली. तसेच दोन वेळा रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना रुग्णालयात आणले. जखमींमध्ये लहान बालकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, अद्यापपर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.