जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच एका व्यापाराचं अपहरण करून खंडणी मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याने खंडणीखोरांना पैसे देऊन आपली सुटका करून घेतली आहे. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी अमोल दुबे यांची परळीत एक एजन्सी आहे. आपले काम आटपून दुबे घरी जात असताना त्यांना पाच अनोळखी इसमांनी अडवले. यानंतर दुबे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले. या दरम्यान त्यांना दोन कोटींची मागणी खंडणीखोरांनी केली. यावेळी त्यांनी विनंती करून तीन लाख 87 हजार रुपये रोख आणि दहा तोळे सोनू देऊन आपली सुटका करून घेतली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. आज अमोल दुबे यांनी परळी शहर पोलीस गाठून याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोन पथकाच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. ही अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. बीड जिल्ह्यात 24 तासात अपहरणाच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता दुबे यांच्या अपहरणातील आरोपींना पकडण्याचे आव्हान परळी पोलिसांसमोर आहे. दरम्यान, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे सोमवारी चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण केले होते. तसेच त्यांना बेदम मारहाण करत अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले होते. काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे मध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.