केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत अहमदपूर महामार्गावर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे. आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून सहा आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सहा जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सहा पथके आरोपींच्या शोधासाठी स्थापन केलीआणि बीडमध्ये पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. केज जवळील तांबवा गावातील शिवारातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे. तर पुढील 48 तासात आरोपींना अटक करू. त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आता उर्वरित आरोपींना पकडण्यात पोलिसांना नेमकं कधी यश मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग मध्ये मागच्या दोन तासापासून रास्ता रोको सुरू आहे तर तिकडे केज शहरांमध्ये सुद्धा बीड लातूर रोडवर रस्ता रोको सुरू आहे.. मस्साजोग जवळ अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर टायर जाळले आहेत. तर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग मध्ये मागच्या दोन तासापासून रास्ता रोको सुरू आहे तर तिकडे केज शहरांमध्ये सुद्धा बीड लातूर रोडवर रस्ता रोको सुरू आहे.. मस्साजोग जवळ अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर टायर जाळले आहेत. तर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.