कुरुक्षेत्र येथे एका व्यक्तीने आर्थिक व्यवहाराच्या तणावामुळे आई-वडील आणि पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. त्याने आपल्या 13 वर्षाच्या मुलालाही विष देण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाचा जीव वाचला. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये पैशाच्या व्यवहाराचा उल्लेख आहे. एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना पुढे आलीये. कुटुंबातील व्यक्तीने आपल्या आई-वडिलांची पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. फक्त हेच नाही तर त्याने आपल्या तेरा वर्षाच्या मुलाची हत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने मुलगा वाचला. लोकांनी मुलाला रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. ही घटना हरियाणातील कुरुक्षेत्रातील यारा गावातील आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.
आई-वडिल आणि पत्नीची हत्या करणाऱ्याचे नाव दुष्यंत (वय 38) असून तो शाहाबाद कोर्टात कामाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुष्यंत हा पैशांच्या व्यवहाराला कंटाळला होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दुष्यंत याने सर्वात अगोदर वडिलांना बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्यांचा गळा दाबला. आई आणि पत्नीला त्याने विष दिले आणि त्यानंतर त्यांचाही गळा दाबून खून केला. त्याने स्वत: देखील विष पिले आणि आत्महत्या केली. हैराण करणारे म्हणजे तो आपल्या तेरा वर्षीय मुलाला देखील विष पाजवत होता. मात्र, नातेवाईकांनी मुलाची सूटका करत त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही मिळाली आहे. त्यामध्ये त्याने पैशांच्या व्यवहाराचा उल्लेख केल्याचे बघायला मिळतंय. पैशांच्या व्यवहारामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. पोलिसांनी नायब सिंग (55), त्यांची पत्नी अमृत कौर (50), अमनप्रीत (35) आणि आरोपी दुष्यंत (38) यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले.