अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. ते अमित शाहांच्या भेटीसाठी गेले होते. पण, दोन दिवस थांबूनही त्यांची अमित शाहांसोबत भेट झाली नाही.राज्यात महायुतीला बहुमत तर मिळालं पण सत्ता स्थापनेच्या वाटेत काही अडथळेही आले. मात्र, या सर्वांवर मात करत भाजपने अखेर आज देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड केली आणि ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री कोण होणार यावर अजूनही निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. पण, भाजपने त्यांना गृहमंत्रिपदाऐवजी आणखी दोन महत्त्वाची खाती देण्याचा प्रस्ताव दिला. तर, अजित पवार सध्या महत्त्वाची खाती मिळावी या आशेने भाजप वरिष्ठांच्या भेटीसाठी फिरत आहेत.
अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रवादीलाही महत्त्वाची खाती मिळावी अशी मागणी करणार होते. पण, अजित पवार आणि शाहांची भेट झालीच नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दोन दिवस दिल्लीत थांबूनही अमित शाहांची भेट न झाल्याने अजित पवार रिकाम्या हाताने आज दिल्लीहून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ पवारही दिल्लीला होते.मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर आज शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक होणार आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. वर्षा बंगल्यावर या तिन्ही नेत्यांची बैठक पार पडेल. त्यासाठीच अजित पवार दिल्लीतून आज मुंबईत आले.वसेनेला जेवढी मंत्रिपदं मिळणार तेवढीच राष्ट्रवादीला द्या, अशी मागणी घेऊन अजितदादा दिल्ली दरबारी पोहोचले होते. पण, अमित शाहांसोबत भेट न झाल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता महायुतीच्या होणाऱ्या या बैठकीत अजित पवार काय मागण्या करतात, शिंदे फडणवीसांचं ऐकणार का, अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत.