गाडीचे इंडीकेटर तुटल्याच्या कारणावरून विकास प्रवीण पाटील वय २९ रा. अमळनेर या तरूणाला मारहाण करून जीवेठार केल्याची धक्कादायक घटना अमळगाव ते जळोद रस्त्यावर रविवारी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली होती.
या गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना नेरी, पाचोरा आणि पिळोदा अश्या ठिकाणाहून अटक केली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने गुरूवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विकास पाटील हा तरूण आपल्या मित्रांसोबत तमाशा पाहण्यासाठी गेला होता. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना त्यांच्या दुचाकीला स्विप्ट कार (एमएच १९ बीजे ४७९१) ने कट मारला. यात दुचाकीचे इंडीकेटर तुटले. यामुळे दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यात काही जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून विकास पाटील याचा खून करण्यात आला. त्यानंतर मारेकरी पसार झाले होते. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गोपनिय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपींच्या शोधासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. या गुन्ह्यातील ६ संशयित आरोपींना बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वजाता अटक करण्यात आली.
संशयित आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव या तिघांना नेरीतून अटक केली. कमलाकर हनुमंत श्रीगणेश याला पाचोरा येथून तर रोहित सिताराम पाटील आणि मनोज हनुमंत श्रीगणेश याला पिळोदा येथून अटक केली आहे. सर्व आरोपींना अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, दिपक माळी, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, रविंद्र पाटील, भगवान पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहूल महाजन, जितेंद्र पाटील, राहूल कोळी, विलास गायकवाड, भारत पाटील यांनी केली आहे.