देवरे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.
नंदुरबार श्री. धगाई विधायक कार्य मंडळ संचलित श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके तर प्रमुख व्याख्याते सी.व्ही.नांद्रे होते.मान्यवरांहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सी.व्ही.नांद्रे यांनी आपल्या व्याख्यानातून ‘ग्रंथ आणि ग्रंथालय म्हणजे समाज संस्कृतीच्या धमन्या असतात. वास्तविक सर्वच वयोगटातील व्यक्तींना भवसागरात तरण्यासाठी वाचन नौकेचा आधार महत्त्वाचा म्हणता येईल.वाचनाच्या जीवनसत्वामुळे मानसिक, बौद्धिक,सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यामध्ये सहयोग मिळतो. उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक असावा लागतो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम हे ज्येष्ठ वैज्ञानिक, कुशल संशोधक होते. तसेच ते कसलेले लेखक देखील होते. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा समन्वित पाया त्यांच्या समृद्ध वाचनवृत्तीने घातला आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो या शब्दात केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.डी साळुंके यांनी आपल्या मनोगतातून वाचन संस्कृतीमुळे जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश म्हणजे जपान अन्य कोणत्याही शोधा पेक्षा लिहिण्या-वाचण्याच्या शोधाने मानवाच्या जाणिवा व नेणीवांमध्ये क्रांतिकारक बदल केला आहे. महान व्यक्तींची जीवनचरित्र वाचन तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल विचार करायला लावतो हेच वाचनाचे सौंदर्य वाचक मनाला आत्मचिंतन,शोधन व बोधन करण्यास प्रवृत्त करते.
म्हणूनच ॲसमुस हा पाश्चिमात्य विचारवंत म्हणतो,”मला थोडे पैसे मिळाले की, मी पुस्तक विकत घेतो.त्यातून पैसे उरले तर अन्न व कपडे खरेदी करतो.”याचं कारण म्हणजे पुस्तक ही ‘ज्ञानाची सदावर्ते’ किंवा ‘ज्ञानाची पाणपोई’असतात.म्हणूनच ज्ञानयुगात नवीन सुविचार जन्माला आला आहे, “वाचल्याने होते रे, परी आधी वाचलेची पाहिजे. जो वाचन विसरला त्याचा कार्यभाग बुडाला.” डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयात विद्यालयातील मुख्याध्यापक,कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थिनींनी एक तास अवांतर वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. मराठे, तर आभार प्रदर्शन व्ही.बी.अहिरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक डी.बी.भारती,एम.डी नेरकर, वाय.डी.बागुल,आर.आर. बागुल,एस.एच.गायकवाड , सुनील पाटील, हेमंत खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.